ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    
बातम्या

नौशेरा येथील चकमकीत साताऱ्यातील जवान संदीप सावंत शहीद

पोस्ट :  जानेवारी 01, 2020 06:54 PMमराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत नौशेरा (जम्मू सेक्टर) येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. ते सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवासी होत. २५ वर्षीय संदीप यांच्यामागे पत्नी सविता या आहेत. 

 

        नववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह अन्य गस्ती चमूतील अन्य सहकारी तात्काळ सज्ज झाले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे दहशतवाद्यांची नेमकी संख्या कळू शकत नव्हती. त्यामुळे नाईक संदीप यांनी आघाडीवर जात हल्ला चढवला. 


        त्या दरम्यान झालेल्या गोळीबारात ते व नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले. दरम्यान, यानंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. शोधमोहीम सुरू असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.


           या वेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. जम्मू-काश्मीरमध्ये सन २०१९ मध्ये १६० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर १०२ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.