ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    
बातम्या

‘भारतरत्न’ पुरस्काराचे मानकरी - लालबहादूर शास्त्री

पोस्ट :  जानेवारी 07, 2020 06:50 PM



‘भारतरत्न’ हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९५५ पासून हा पुरस्कार देशासाठी योगादान देणा-या महान व्यक्तींनाच देण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष स्व. नेल्सन मंडेला हे एकमेव नेते असे आहेत जे ‘भारतरत्न’ पुरस्कार दिले गेलेले भारताबाहेरील आहेत. अशा या भारतरत्न पुरस्कार मिळविणा-या विभूतींनी विविध क्षेत्रात देशाची मान उंचवणारी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच या महान व्यक्तींची संग्रहीत माहिती वाचकांसाठी येथे क्रमशा: देत आहोत. १९६३ मध्ये ज्यांना भारतररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ते थोर नेते लालबहादूर शास्त्री यांची थोडक्यात माहिती. 

 

         वाराणसीच्या मुगलसराय नामक भागात एका अत्यंत सामान्य कायस्थ कुटुंबात दि. २ ऑक्टोबर १९०४ रोजी लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला. ते केवळ दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांची आई रामदुलारी, त्यांना घेऊन आपले वडील श्री. हजारीलाल यांच्याकडे आली. तिथे आपल्या आजोळी त्यांचे पालनपोषण व सहावीपर्यंतचे शिक्षण झाले.

 

        बालवयापासून त्यांच्याकडे आत्मविश्वास व स्वावलंबन होते. स्वत:चे कपडे स्वत: धुणे, बूट पॉलिश करणे, आठ मैल चालत शाळेत जाणे, पैसे नसतील तर नदीत पोहून पलीकडे जाणे, अर्धपोटी राहणे हे सगळे कष्ट सहन करीत ते आपले शिक्षण पूर्ण करत होते. पुढच्या शिक्षणासाठी ते बनारसच्या हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये, आपल्या मावशीकडे राहण्यास आले.

 

        त्या काळात स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. बनारसला लोकमान्य टिळकांचे भाषण ऐकण्यासाठी ते ८० मैल चालत येण्यास निघाले कारण भाड्यासाठी पैसे नव्हते. इ. स. १९२१ मधल्या देशातल्या असहकार चळवळीत लालबहादूरजी, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक अशा आपल्या सगळ्या अडचणी बाजूला ठेवून सामील झाले. देशातील जमीनदारी समूळ नष्ट करण्यासाठी शास्त्रीजींनी जमीनदारी निर्मूलन करणारा एक रिपोर्ट तयार केला. तोच खूप महत्त्वाचा ठरला. देशभक्ती आणि अभ्यास दोन्हीही एकाच वेळी चांगल्या प्रकारे चालू ठेवण्यासाठी इ. स. १९२१ मध्ये प्राचार्य डॉ. भगवानदास यांच्या सल्ल्यावरून लालबहादूरींनी 'काशी विद्यापीठात' प्रवेश घेतला. तेव्हा तिथे आचार्य नरेंद्रदेव आचार्य कृपलानी, श्री श्रीप्रकाश, डॉ. संपूर्णानंद हे प्राध्यापक होते. तिथे त्यांनी रामकृष्ण परमहंस, संत विवेकानंद, महात्मा, टॉलस्टॉय, लेनिन यांच्या साहित्याचा भरपूर अभ्यास केला. 'शास्त्री' ही पदवी मिळविली. यानंतर लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या 'लोक-सेवक मंडळ' या संस्थेमध्ये सभासदत्व घेऊन साठ रुपये मासिक पगारावर देशसेवेच्या कामाला सुरुवात केली. लालबहादूरजींच्या वयाच्या २३ व्या वर्षी इ. स. १९२७ मध्ये मिर्जापूरच्या १७ वर्षे वयाच्या ललितादेवींशी त्यांचा विवाह झाला. ते हुंडा प्रथेविरुद्ध असल्याने लग्नामध्ये त्यांनी आपल्या सासऱ्यांकडे ललितादेवींसाठी एक जोडी कडी, एक साडी, सिंदर व स्वत:साठी चरखा एवढेच मागितले. ललितादेवींनी स्वत:ला आदर्श गृहिणी म्हणून सिद्ध केले व शेवटपर्यंत देशसेवेच्या जीवनाच्या मार्गात शास्त्रीजींना मदत केली.

 

          लग्नानंतर लालबहादूरजी स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. इ. स. १९३० ते इ. स. १९४५ या काळात ९ वर्षे ते तुरुंगात होते. तिथे अनेक प्रकारच्या यातना शास्त्रीजींना भोगाव्या लागल्या. इ. स. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यावर प्रांतीय विधान मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. इ. स. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोविंद वल्लभ पंतांनी त्यांना उत्तर प्रदेशात पोलीस व परिवहन मंत्री पद दिले. इ. स. १९४९ मध्ये शास्त्रीजी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात गृहमंत्री झाले; पण नेहरूंनी त्यांना लगेचच राज्यसभेचे सदस्य करून नवीन मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणून नेमले. इ. स. १९५७ च्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये पुन्हा जिंकून आल्यावर संचार व परिवहन मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी दिली. मग वाणिज्य व उद्योगमंत्री पद दिले. नंतर १९६१ मध्ये शास्त्रीजी गृहमंत्री झाले. त्या वेळी त्यांनी आसाममधील भाषा-समस्या व पंजाबी सुभ्याच्या निर्मितीची समस्या दोन्ही प्रश्न कुशलतेने सोडविले. इ. स. १९६२ मध्ये जेव्हा 'कामराज योजने'च्या बाबतीत केंद्रीय मंत्र्यांना आपले पद स्वेच्छेने सोडायचे होते, तेव्हा सर्वप्रथम शास्त्रीजींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

 

           पण मे १९६४ मध्ये पं. नेहरूंच्या मृत्यूनंतर ९ जून १९६४ रोजी संसद सदस्यांनी एकमताने लालबहादूर शास्त्रींना आपला नेता निवडून भारताचे पंतप्रधान बनविले. दिनांक १६ मे १९६५ रोजी जेव्हा पाकिस्तानने श्रीनगर-लेह सीमेवरून आक्रमण केले; तेव्हा शास्त्रीजींनी भारतीय सेनेला आदेश दिला. तेव्हा बार फुट उंचीवरील या प्रदेशाला भारतीय सेनेने प्रत्युत्तर देऊन लगेच मुक्त सह स. १९६५ मध्ये देशापुढे जेव्हा दुष्काळाची समस्या उभी राहिली तेव्हा अमेरिकेच्या अपमानास्पद अटींना योग्य उत्तर देऊन देशातच समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

 

           इ. स. १९६५ च्या पकिस्तानच्या भारतावरील आक्रमणाला चोख उत्तर देऊन शास्त्रीजींनी स्वतंत्र भारताला पहिला विजय मिळवून दिला. आपल्या अल्प कार्यकाळामध्ये लालबहादूरजींनी जगातील राजनीतिज्ञांना स्वत:ची अभूत कार्यक्षमता, दक्षता, राजनैतिक कौशल्य व समजदारी दाखवून दिली. शांतीचा पुजारी असलेला भारत वेळप्रसंगी माजलेल्या विक्राळ हत्तीचे गंडस्थळ फोडण्यासाठी एक क्रुद्ध सिंहही बनू शकतो, हे जगाला दाखवून दिले.

 

         रशियाचे प्रधानमंत्री कोसिजिन यांनी शास्त्रीजींना ताश्कंदला, पाकिस्तानबरोबर शांतता करार करण्यासाठी पाकचे राष्ट्रपती अयूब खान यांच्याबरोबर बोलाविले. तेव्हा दि. १० जानेवारी १९६६ रोजी ताश्कंदला हा करार झाला. त्यानंतर त्यांना परत भारतात यायचे होते; पण मध्यरात्री एक वाजता शास्त्रीजींना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. 

 

          दि. २६ जानेवारी १९६६ रोजी विशेष समारंभात भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी शास्त्रीजींना मरणोत्तर 'भारतरत्न' किताब देऊन राष्ट्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. मरणोत्तर 'भारतरत्न' किताब मिळालेले श्री. लालबहादूर शास्त्री हेच पहिले भारतीय आहेत.