ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

गुन्ह्यांचे प्रमाण कसे घटणार ?

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 08, 2020 01:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गुन्ह्यांचे प्रमाण कसे घटणार ?

शहर : मुंबई

            गेल्या ८-१० दिवसांतील गुन्हेगारीच्या घटना पहाता समाजमन ढवळून निघत आहे. आधुनिक युगात सर्व जग मुठीत आलेले असताना दिवसेंदिवस माणूस मात्र अस्वस्थ, एकटा आणि आत्मघातकी निर्णय घेत टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे. सुविधा उपलब्ध झाल्या पण समाधान लाभत नाही. कठोर कायदे करूनही गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नाही. यानिमित्ताने एका नाटकातील एक वाक्य आठवले, "सजा देऊन आणि सजा भोगून सारे गुंते सुटले असते तर किती बरे झाले असते.'' पण आपल्या लोकशाहीत तर गुन्हेगाराला सजा होईलच याचीही शाश्वती राहिलेली नाही. गुन्हेगारांना वाचविण्यासाठी कायद्यातील पळवाटा शोधल्या जातात. गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा होत नाही. परिणामी गुन्हे करणारांचे प्रमाण वाढत जाते. काही विचारवंत यासाठी चित्रपट व दूरदर्शनवरील मालिकांना दोष देतात. त्यांचा प्रभाव समाजावर होतो, असा आक्षेपही घेतला जातो. सभोवताली जेव्हा असे गुन्हे घडत असतात तेव्हा समाज मूकदर्शक राहतो, हे सत्यही नाकारता येणार नाही. 

            हिंगणघाटातील प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात जाळण्याचा प्रयत्न होतो. दोंडाईचात एक मुख्याध्यापक वयोरुद्ध मातेला घरात कोंडून बाहेरगावी निघून जातो. जळगावत समाजामध्ये घेतले जात नाही आणि त्यामुळे विवाहही होत नाही, म्हणून मानसी बागडेसारखी तरुणी आत्महत्या करते. मुंबईत सांताक्रूझमध्ये मद्यधुंद दोन इसमांनी शेजारच्या महिलेवर घरात बोलावून बलात्कार करून तिची हत्या केली. तत्पूर्वी त्या नराधमांनी तिला मारहाणही केली. अशा एक ना अनेक मन विषण्ण करणार्‍या घटना घडत असताना समाज तटस्थ असल्याचे पहायला मिळते. समाज म्हणून आपलीही काही जबाबदारी असते. याचे भानही कुणाला आहे असे दिसत नाही. काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते निराधारांसाठी पुढे सरसावल्याचे वृत अधूनमधून वाचायला मिळते, तेवढाच एक दिलासा मिळतो. 

           एरवी आपल्याकडे पक्षी वाचवा, प्राणी वाचवा, वनांचे रक्षण करा, अशा मोहीमा मोठा गाजवाजा करीत राबविल्या जातात. पण आज खरं तर 'माणूस वाचवा', माणुसकी टिकवा, माणसासारखं वागा अशी मोहीम राबविण्याची वेळ आलेली दिसते. समाज हा कीर्तनाने घडत नसतो तसाच तो तमाशानेही बिघडत नसतो, असे म्हणतात. समाज एकीच्या भावनेवर निर्भर असतो. ती एकी किवा ऐक्य दिसत नाही. अति स्वच्छंदी वृत्ती, हव्यास, संकुचित स्वभाव, हेवा, मत्सर इत्यादी दुर्गुण ठासून भरलेल्या विघ्नसंतोषी व्यक्तींचाच समाजात अधिक भरणा दिसून येतो. साहजिकच शेजारी कोलाहल झाला तरी त्याची दखलही घेत नाही. रस्त्यावर भीषण घटना घडत असेल, अनुचित प्रकार कोणी करीत असेल तर त्याचे लाईव्ह चित्रण मोबाईलवर करणारे अनेक महाभाग सर्व ठिकाणी पहायला मिळतात. मदतीची भावनाच लोप पावली असल्याचे यातून दिसून येते. कायदा आणि सुरक्षा रक्षक यांच्यापेक्षाही समाजाची जबाबदारी अधिक मोठी असते. आजचा समाज गुन्हेगारीलाच चालना देणारा दिसतो. गुन्हेगाराला सामूहिकरित्या रोखण्याचे धाडस आजचा समाज गमावून बसल्याचे अनुभवास येते. 

             पूर्वीच्या काळात मुंबईसारख्या शहरात चाळ संस्कृती सुखनैव नांदत होती. याचा अर्थ पूर्वी गुन्हे घडत नव्हते असे नाही. पण त्याचे प्रमाण कमी होते. गुन्हेगारी प्रवृतीच्या भाई, 'दादांच्या समाजाला त्रास नव्हता. उलट समाजाला त्यांचा आधारच वाटत होता. शेजारधर्म पाळला जात होता. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांवर चांगले संस्कार घडत होते. पोलिसांचा आदरयुक्त धाक होता. समाजात ऐक्याची भावना होती. सुख-दु:खात समाज एकवटत होता. प्रसंगात एकमेकांना मदत करीत होता. आज तो समाज दिसत नाही. बघ्यांची संख्या वाढली, सहकार्याची भावनाच नाहीशी झाली की, काय होते ते या घडणार्‍या घटना दाखवून देतात. पण यातून बोध कोण घेणार? हा खरा सवाल आहे.      

   
 

मागे

वडाच्या पारावर   - पुन्हा आश्वासने 
वडाच्या पारावर - पुन्हा आश्वासने 

गण्या -: काय रं मन्या बजेट म्हंजे काय? संत्या -: आमाला समजल आसं सांग. मन्या -: कें....

अधिक वाचा

पुढे  

वडाच्या पारावर - #कोरोना - माझं गाव बंद
वडाच्या पारावर - #कोरोना - माझं गाव बंद

गण्या-:  अरे संत्या काय झालं इतका येळ केलास मण्या  -: आर.. कुठं व्हतास तुला ....

Read more