ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खेळांचा राजा - मल्लखांब!

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2019 07:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

खेळांचा राजा - मल्लखांब!

शहर : मुंबई

ही गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची! दुस-या बाजीराव पेशव्यांच्या काळातली. मराठी राज्य पानिपतच्या दारुण पराभवातून सावरू पाहात होते,
 भारतभर पसरत चाललेल्या इंग्रजांच्या साम्राज्याला तोंड देण्याचा निकराचा प्रयत्न करत होते. 
राजकीय व सामाजिक अस्थिरता, अंतर्गत कलह, फाटाफुटीचे राजकारण यांमध्ये मराठी दरबारापुढे एक आव्हान येऊन ठेपलेले होते, ते हैदराबादच्या निजामाकडून! 
विविध राज्यांमधून विजय मिळवत आलेल्या अली व गुलाब या, दोन कसलेल्या, भीमकाय व बलदंड पैलवानांनी दुस-या बाजीराव पेशव्यांच्या भरदरबारात कुस्तीचे आव्हान दिले होते. पैलवानांचा आत्मविश्वास, त्यांची रग व तयारी बघून दरबारात पेशव्यांच्या पदरी असलेल्या बावन्न पैलवानांपैकी एकाचीही आव्हान स्वीकारण्याची हिंमत झाली नाही. 

पेशव्यांची इभ्रत पणाला लागल्याचे पाहून, पेशव्यांकडे भिक्षुकी करणा-या सतरा-अठरा वर्षांच्या बाळंभटदादा देवधर यांनी ते आव्हान स्वीकारले व तयारीसाठी काही मुदत मागून घेतली.
 त्यांनी त्यांच्या नाशिकजवळच्या कोठुरे गावी जाऊन मातेचे आशीर्वाद घेतले आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या, वणीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तशृंगी देवीची आराधना सुरू केली. प्रचंड व्यायाम सुरू केला एका लाकडाचा खांबाचा आधार घेऊन!
 बाळंभटदादा ठरलेल्या मुदतीत पुण्याला परतले आणि स्वत:पेक्षा वयाने, अनुभवाने, वजनाने मातब्बर असलेल्या अलीला गळखोड्याच्या डावांनी चीतपट केले.
 गुलाब तर  बाळंभटदादांची तयारी पाहूनच अक्षरश: पळून गेला. 
बाळंदादांनी ज्या लाकडी खांबावर कसून सराव केला, त्या खांबाला त्यांनी ‘मल्लखांब’ असे नाव दिले. 

मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत ज्याच्यावर सराव करायचा तो मल्लखांब.  मग प्रसिद्ध पावला!
अशा त-हेने कुस्तीला पूरक व्यायामप्रकार म्हणून मल्लखांबाची सुरुवात झाली.

मल्लखांब हा काटकसरीचा खेळ आहे. 
त्याच्यासाठी फार मोठी साधनसामुग्री लागत नाही. मोठे मैदान, वारंवार लागणारे चेंडू, रॅकेटस्, बूट यांचीही गरज नसते.

मल्लखांबाचे सर्व प्रकार डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंनी केले जात असल्यामुळे शरीराची जडणघडण दोन्ही बाजूंनी चांगली होते. 
शरीर प्रमाणबध्द व सौष्ठवपूर्ण दिसू लागते. मल्लखांब हा एकमेव क्रीडाप्रकार असा आहे, की तो 
उत्तम आरोग्यासाठी, प्रमाणबध्द शरीरासाठी,     कुशाग्र मानसिक क्षमतेसाठी आणि स्पर्धात्मक क्रीडाकौशल्य वृध्दीसाठी उपयोगी आहे.

परदेशी क्रीडातज्ज्ञांनीही ‘कमीत कमी वेळात शरीराच्या जास्तीत जास्त भागांना जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडाप्रकार’ असे मल्लखांबाचे यथार्थ वर्णन केले आहे.

असा हा अल्पमोली,
 बहुगुणी आपल्या मातीतला अस्सल म-हाटमोळा व्यायामप्रकार.

खोखो, लंगडी, कुस्ती, कबड्डी, चेंडूचेही खेळ आहेत ।
देशी, परदेशी क्रीडाप्रकार - सगळ्यांत सुप्त गुण आहेत ।।
वेग, शक्ती, लवचिकता व कसावाचून चालत नाही ।
देवाशप्पथ खरं सांगेन, व्यायामात मऱ्हाटमोळ्या मल्लखांबाला पर्याय नाही ।।

मागे

नसलेल्या बंधाऱ्यांची  गोष्ट 
नसलेल्या बंधाऱ्यांची  गोष्ट 

काय लिहावं , हा सध्या पडलेला प्रश्न,जे लिहावं ते खर आणि बर लिहावं हे त्यावरचं ....

अधिक वाचा

पुढे  

आमचं बिनसलयं
आमचं बिनसलयं

गण्या : कारं, संत्या आणि मन्या एकदम गप्प बसताय? संत्या : आमचं बिनसलंय. गण्या :....

Read more