ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मानवी हक्काचे खांदे पुरस्कर्ते कायदेतज्ञ राम जेठमलानी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 09, 2019 02:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मानवी हक्काचे खांदे पुरस्कर्ते कायदेतज्ञ राम जेठमलानी

शहर : मुंबई

ज्येष्ठ  कायदेतज्ञ राम जेठमलानी  यांचे रविवारी सकाळी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. न्यायदान क्षेत्रात  ते जवळपास 70 वर्षे कार्यरत होते.

स्वतंत्र आणि धाडसी भूमिका आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ते अनेकदा चर्चेत राहिले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अत्यंत गाजलेल्या म्हणण्यापेक्षा खळबळजनक प्रकरणातील आरोपींच्याच बाजूने खटले लढविले. देशात सर्वाधिक मानधन घेणारे वकील म्हणून राम जेठमलानी ओळखले जात.

सध्याच्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील शिकारपूर येथे 14 सप्टेंबर 1923 रोजी राम जेठमलानी यांचा जन्म झाला. कराचीमधील शहाणी कायदा कॉलेजमधून त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षीच कायद्याची पदवी संपादन केली. तेथेच त्यांनी वकील म्हणून सराव करण्यास सुरवात केली. त्याचवेळी त्यांचा विवाह झाला. त्यांना 4 मुले झाली. त्यातील दोघांचे निधन झाले. तर त्यांचा मुलगा महेश नामांकित वकील आहे. आणि मुलगी शोभा सध्या अमेरिकेत आहे. त्यांची सिंध प्रांताशी असलेली जवळीक कायम राहिली. आपल्या राष्ट्रगीतामधील 'सिंध' शब्द वगळण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात त्यांनी विरोध केला होता. वकिलीच्या सरावासाठी किमान वय 21 असावे म्हणून त्यांनी कराची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांचे मित्र आणि वरिष्ठ वकील ए.के. ब्रोही यांच्याबरोबर त्यांनी कराचीमध्ये वकिली फर्मची स्थापना केली. फाळणीनंतर 1948 ला ते भारतात मुंबई मध्ये आले. 'बॉम्बे रेफ्युजी अॅक्ट' ला विरोध करणार्‍या विरोधातील कायद्याची लढाई त्यांनी जिंकली.

1959 मध्ये के. एम. नानावटी विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यानंतर राम जेठमलानी प्रकाशझोतात आले. यशवंत चंद्रचूड यांच्यासोबत त्यांनी हा खटला लढविला होता. नौदलाच्या कमांडरने त्याच्या पत्नीच्या प्रियकराच्या  हत्येचा प्रयत्न केला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हत्याप्रकरणातील आरोपी कहर सिंग आणि बलविर सिंग  यांच्यातर्फे  त्यांनी  युक्तिवाद केला. त्यावेळी आरोपींचे वकीलपत्र घेण्याचे धाडस कोणी केले नाही. पण जेठमलानी यांनी हा खटला आरोपींच्या बाजूने लढविला. यातील बलविर सिंगची सुटका करण्यात त्यांना यश आले. बलविरचा मुलगा राजिंदर सिंगला  सरकारी नोकरीतून काढून टाकण्यात आले. तेव्हा जेठमलानी यांनी त्याला आपल्या कार्यालयात नोकरी दिली. पंजाबमध्ये 1980 च्या दशकात दहशतवाद फोफावला होता. त्यावेळी संत लोंगोवाला यांना बेकायदा ताब्यात घेण्याला त्यांनी विरोध केला होता. बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी यांना प्रत्येक दिवशी 10 प्रश्न जेठमलानी यांनी विचारले होते.

संसद हल्ला प्रकरणातील दिल्ली विद्यापीठातील प्रा.एस.ए.आर.गिलानी यांचेही वकीलपत्र त्यांनी स्वीकारले होते. गिलानी यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हर्षद मेहता आणि केतन पारेख शेअर बाजार घोटाळा प्रकरणातही त्यांनी युक्तिवाद केला होता. त्याचबरोबर विदेशातील काळा पैसा भारतात आणण्यासाठीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता. याशिवाय हवाला प्रकरणात भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे, बेहिशेबी मालमता प्रकरणात जयललिता यांचे, टु जी घोटाळ्यातील कनिमोझी यांचे, चारा घोटाळा प्रकरणातील लालूप्रसाद यादव यांचे, खाण घोटाळा प्रकरणात बी.एस.येडियूरप्पा यांचे, फौजदारी बदनामी प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचेही वकीलपत्र त्यांनी घेतले होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला जामीन मिळावा म्हणून त्यांनी युक्तिवाद केला होता. हायप्रोफाईल जेसिका लाल हत्या प्रकरणासाठी जेठमलानी यांनी आरोपी मनू शर्माची बाजू न्यायालयात मांडली होती. मानवी हक्कांचे खरे पुरस्कर्ते जेठमलानी होते, असे त्यांचे सहकारी वकील संबोधित असत.

राम जेठमलानी यांची राजकीय कारकीर्दही तेवढीच वादग्रस्त ठरली होती. महाराष्ट्रातील उल्हासनगर येथून 1971 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनसंघाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढविली. पण ते पराभूत झाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीला त्यांनी तीव्र विरोध केला होता. पुढे जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय जनता दल या पक्षांच्या तिकीटावर ते संसदेत निवडून आले होते. आणीबाणीनंतर मुंबईतून 1977 आणि 1980 मध्ये लोकसभेत जनता पक्ष आणि भाजपाच्या तिकीटावर निवडून गेले होते. 1996 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात जेठमलानी केंद्रीय कायदामंत्री होते. तर 1998 मध्ये केंद्रीय नागरी विकासमंत्री होते. त्यावेळी सरन्यायाधीश आदर्श सेन आनंद व अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 2004 मध्ये त्यांनी वाजपेयींविरुद्ध लखनौ येथून निवडणूक लढविली 2010 मध्ये ते पुन्हा भाजप मध्ये आले. राजस्थान मधून ते राज्यसभेवर गेले. 2013 मध्ये भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत पक्षातून त्यांना 6 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. पक्षाच्या या निर्णयाविरोधात जेठमलानी यांनी न्यायालयात दावा दाखल करून 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागणी केली. अखेर विद्यमान भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने हे प्रकरण मिटले. सोहराबुद्दीन  शेख बनावट चकमक प्रकरणात जेठमलानींनी अमित शहा यांना पाठिंबा दिला होता. वयाच्या 64 व्या वर्षी 1987 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीही घोषित केली होती. 1988 मध्ये त्यांनी 'भारत मुक्ति मोर्चा' नावाने राजकीय आघाडी स्थापन केली होती. तर 1995 मध्ये त्यांनी 'पवित्र हिंदुस्तान कळघम' नावाने राजकीय पक्षाचीही स्थापना केली होती.

राम जेठमलानी कामाच्या आणि इतर प्रत्येक बाबींमध्ये अत्यंत शिस्तबद्ध होते. बॅडमिंटन हा त्यांचा आवडता खेळ होता. 4 वर्षापूर्वी ते हा खेळ खेळत होते. विशेष म्हणजे त्यांनी सगळ्या प्रकारची प्रकरणे हाताळली. श्रीमंताची वकीलपत्र घेत त्यांनी अमाप पैसा कमावला आणि हा पैसा त्यांनी गरीब अशिलांसाठी  वापरला. भारतीय फौजदारी कायदा क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे.

 

मागे

गजाननाला साकडं घालूया. . .
गजाननाला साकडं घालूया. . .

गण्या : मन्या तुमचे वाडीत सार्वजनिक गणपती आणताय, आसं आयकलं. संत्या : खरं की क....

अधिक वाचा

पुढे  

विज्ञानातील प्रयोगच थक्क करणारे असतात !
विज्ञानातील प्रयोगच थक्क करणारे असतात !

इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वकांक्षी चंद्रयान 2 ची म....

Read more