By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 31, 2020 03:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठी रंगभूमीलाही आर्थिक मंदीचा फटका बसत आहे. काही मोजकी नाटकेच नामांकित नटांच्या नावावर व्यवसाय करीत आहेत. वाढत्या महागाईमुळे रसिक प्रेक्षक थिएटरकडे फिरकेनासे झाले आहेत. अशा स्थितीत देखील काही संस्था मोठ्या जिद्दीने रंगभूमीवर नाटके सादर करीत आहेत. काही मोजक्याच नाटकांना १ लाखांपर्यंत बुकिंग होते. इतर नाटके ४० हजारांचा टप्पाही गाठत नाहीत. या पार्श्वभूमीवर नाटककार प्रा.वसंत कानेटकर यांची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहात नाही. आज त्यांची १९ वी पुण्यतिथी आहे. प्रा. कानेटकरांचे नाटक आणि मोहन वाघ याची चंद्रलेखा संस्था हे समीकरण यशस्वी झाल्याचे पहायला मिळाले होते. कांनेटकरांनी ४३ नाटके लिहिली. त्यांची बहुतेक नाटके व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी झाली होती.
प्रा. कानेटकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे २० मार्च १९२२ रोजी झाला. मराठी भाषेतील कवि गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर हे त्यांचे वडील होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात वसंत कानेटकर प्राध्यापक होते. नाशिकमधील ' शिवाई' बंगला येथे प्रा.कानेटकर यांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते. प्रा. कानेटकरांनी मराठी साहित्यातील नाटक, कथा, समीक्षा, आत्मकथा, एकांकिका, कादंबरी असे विविध प्रकार लिलया हाताळले. नाट्य प्रकारातही संगीत नाट्य, ऐतिहासिक नाटके, सामाजिक नाटके आदी प्रकारही यशस्वीपणे हातळल्याचे दिसते. त्यांच्या अश्रुंची झाली फुले या सदाबहार नाटकावर बेतलेल्या "ऑसू बन गये फूल" या हिंदी चित्रपटाला १९६६ साली सर्वोकृष्ट कथेसाठी फिल्मेफेअर पुरस्कार मिळाला होता. १९९२ मध्ये ठाणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या अन्य साहित्य प्रकरांपेक्षाही नाटकांचा प्रभाव अधिक आहे. त्यांनी लिहिलेल्या ४३ नाटकांपैकी ८ नाटकांचे गुजराती भाषेत, ११ नाटकांचे हिंदी भाषेत तर अश्रुंची झाली फुले या नाटकाचे गुजराथी हिंदीसह कानडी भाषेतही अनुवाद केले गेले आहेत. अशी प्रा. कानेटकर यांची विलक्षण प्रभावी प्रतिभा होती.
अश्रुंची झाली फुले या नाटकाने तर इतिहास रचला आहे. प्रभाकर पणशीकरांनी या नाटकसाठी आपल्या नाट्यसंपदा संस्थेतर्फे प्रथम मराठी रंगभूमीवर फिरता रंगमंच आणला. या नाटकातील प्रा. विद्यानंदची भूमिका पणशीकर यांनी आणि लाल्याची भूमिका डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी गाजवली. आजही प्रा. कानेटकर यांचे हे नाटक लागले तरी रसिक प्रेक्षक गर्दी करतात. त्यांच्या 'गगनभेदी' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मोहन वाघ यांनी लंडनला केला. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, जिथे गवतास भाले फुटतात, अशी ऐतिहासिक नाटके, मत्स्यगंधा हे संगीत नाटक, याशिवाय अखेरचा सवाल, लेकुरे उदंड झाली, वादळ माणसाळतंय, विषवृक्षाची छाया, वेड्याचं घर उन्हात, सोनचाफा, हिमालयाची सावली, रंग उमलत्या मनाचे, सूर्याची पिल्ले, प्रेमा तुझा रंग कसा, प्रेमात सगळंच माफ, पंखांना ओढ पावलांची, गरुडझेप, बेइमान, मला काही सांगायचंय, नलदमयंती आदी एकाहून एक सरस, दर्जेदार नाटके कांनेटकरांनी दिली. प्रसिद्ध नाटककार विल्यम्स सेक्शपियरच्या चार नाटकांचे एकत्रिकरण करून त्यांनी 'गगनभेदी' हे नाटक लिहिले असावे, असे म्हणतात. कानेटकरांच्या नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली, असे म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यांच्या नाटकांनी इतिहासच रचला नाही तर काही कलावंतांना नावलौकिकही मिळवून दिला. तर काही नाटके अभिजात कलावंतांनी अक्षरश: गाजवली. कानेटकरांची नाटके नामांकित संस्थानी रंगमंचावर आणली आणि ती यशस्वीही झाली. हाऊसफुल्लच्या पाट्याही त्यांच्या काही नाटकांना लगायच्या. त्यामुळेच आज त्यांची आठवण प्रकर्षाने होत आहे. त्यांच्यासारख्या प्रतिभावंत नाटककारास पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली !
उद्या शुक्रवारपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. १ ....
अधिक वाचा