ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 16, 2021 11:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30

 भारताची लसीकरण मोहीम म्हणजे प्राणाची आहुती दिलेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी

शहर : देश

कोरोना महामारीपासून सर्व देशवासियांना दिलासा देणाऱ्या आणि जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्धाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनाच का लस दिली जात आहे, याचं कारण सांगितलं. प्रत्येक रुग्णाला वाचवण्याच्या प्रयत्नात काही डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, अॅम्ब्युलन्स चालक आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातील काहींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसऱ्याला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

या दिवशाची संपूर्ण देशवासियांनी वाट पाहिली. कोरोनाची लस कधी येणार हा प्रत्येक देशवासियांना प्रश्न पडला होता. आजपासून भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु होईल. मी सर्व देशवासियांना यासाठी शुभेच्छा देतो. आज ते शास्त्रज्ञ, लसीशी निगडीत लोक कौतुकास पात्र आहेत. त्यांनी कुठला सण पाहिला नाही. ना रात्र पाहिली ना दिवस. लस निर्माण होण्यास अनेक वर्ष लागतात. पण भारतात खूप कमी काळात दोन लसींची निर्मिती करण्यात आली आहे. अजून काही लसींचं संशोधन सुरु आहे. हे भारताचं मोठं यश म्हणावं लागेल, अशा शब्दात मोदी यांनी लस निर्मीतीच्या कार्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं.

मानवीय आणि महत्वपूर्ण सिद्धांतांवर आधारीत मोहीम

भारताची लसीकरण मोहीम मानवीय आणि महत्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्याला सर्वाधिक गरज आहे, जो कोरोना रुग्णांशी थेट संपर्कात आहे त्याला सुरुवातीला लस दिली जाणार आहे. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार. त्यानंतर देशाची रक्षा, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, सफाई कर्मचारी आदींना लस दिली जाणार आहे. त्या सर्वांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करेल. या लसीकरणाच्या तयारीसाठी राज्य सरकारांच्या सहकार्यानं ट्रायल्स, ड्राय रन केलं आहे. विशेष बाब म्हणजे CoWin अॅपद्वारे लसीकरण मोहीमेवर लक्ष दिलं जाईल,” असंही मोदी म्हणाले.

कोरोना लसीचे 2 डोस गरजेचे

सर्व देशवासियांना पुन्हा सांगू इच्छितो की, कोरोना लसीचे दोन डोस घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक डोस घेतल्यानंतर दुसरी लस घेण्यास विसरलो असं चालणार नाही. एक लस घेतल्यानंतर पुढे महिन्याभरानंतर दुसरी लस घेणं गरजेचं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 14 दिवसानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतील. त्यामुळे लस घेतल्यानंतर लगेच बेजबाबदारपणे वागू नका. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन सुरु ठेवा,” असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केलं आहे.

भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह- मोदी

भारत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच 3 कोटी लोकांना लस देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आलल्याला ही मोहीम 30 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि गरज असलेल्या लोकांनाच लस दिली जाणार आहे. भारताची लसीकरण मोहीम खूप मोही आहे. त्यामुळे ही मोहीम म्हणजे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन म्हणावी लागेल. आपले शास्त्रज्ञांनी दोन्ही भारतीय बनावटीच्या लसीबाबत खात्री पटल्यानंतरच आपत्कालीन लसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील 60 टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह आहे.

आत्मनिर्भर भारत

महत्वाची बाब म्हणजे भारतीय बनावटीच्या लसीची किंमत अत्यंत कमी आहे. त्या तुलनेत जगभरातील लसीच्या किमती जास्त आहेत. तसंच भारतीय बनावटीची लस ही ट्रान्सपोर्टपासून ते स्टोरेजपर्यंत भारतातील वातावरणाला पुरक आहे. ही लसच आपल्याला कोरोना विरोधातील लढ्यात विजयी करेल. संकट कितीही मोठं असेल, भारतीयांनी आपला आत्मविश्वास कधीही गमावला नाही. भारतात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हा भारतात फक्त एक लॅब होती. पण आता भारतात 2300 हून अधिक लॅब आहेत. सुरुवातीला आपण कोरोनाविषयक अनेक उपकरणांसाठी विदेशावर अवलंबून होतो. पण आज आपण त्याबाबत आत्मनिर्भर आहोत.

मृत आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली

आम्ही दुसऱ्यांच्या कामी आलो, हा निस्वार्थ भाव आपल्या मनात असला पाहिजे. आज आम्ही गेल्या वर्षाकडे पाहिलं तर एक राष्ट्र म्हणून आम्ही खूप शिकलो आहोत. घरातील एखादा व्यक्ती आजारी असेल तर संपूर्ण कुटुंब त्याची सुश्रृषा करतं. पण कोरोनाने आजारी व्यक्तीलाच एकटं पाडलं. अनेक लहान बाळं आईविना रुग्णालयात उपचार घेत होते. अनेक वृद्ध नागरिक आपल्या कुटुंबाविना अनेक दिवस रुग्णालयात होते. कोरोनामुळे मृत्य पावलेल्या लोकांना आपल्या कुटुंबातील कुणी पाहू शकला नाही. कोरोनामुळे समाजात एकप्रकारचं नैराश्य पसरलं होतं. पण नैराश्याच्या या वातावरणात कुणीतरी आशा जागृत करण्याचा प्रयत्न करत होतो. अशावेळी काही लोक आपल्यासाठी त्यांचं आयुष्य संकटात टाकत होते. डॉक्टर, नर्स, अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. त्यांनी अनेक दिवस आपल्या मुला-बाळांना नातेवाईकांना पाहिलं नाही. त्यातील काही सहकारी तर घरी परतू शकले नाहीत. त्यांनी एक-एक जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणारी पहिली लस म्हणजे कोरोनाकाळात मृत्यू पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली आहे.” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी मृत पावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

मागे

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता थेट ‘आकाशवाणी’वरुन इंग्रजीचे धडे!
पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता थेट ‘आकाशवाणी’वरुन इंग्रजीचे धडे!

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा शालेय विद्यार्थ्यांचं मोठं नुक....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई विमानतळावर पैसे घेऊन परदेशी प्रवाशांना अलगीकरणातून सूट, बीएमसीची मोठी कारवाई
मुंबई विमानतळावर पैसे घेऊन परदेशी प्रवाशांना अलगीकरणातून सूट, बीएमसीची मोठी कारवाई

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गैरव्यवहार ....

Read more