ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

40 हजारसाठी पांडुरंगची अडवणूक, रुग्णालयावर कारवाई करा : राधाकृष्ण विखे पाटील

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2020 06:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

40 हजारसाठी पांडुरंगची अडवणूक, रुग्णालयावर कारवाई करा : राधाकृष्ण विखे पाटील

शहर : अहमदनगर

टीव्ही 9 मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना 40 हजार रुपये भरल्याशिवाय दाखल करुन घेण्यास नकार देणाऱ्या कोपरगावातील आत्मा मालिक हॉस्पिटलची मुजोरी समोर आली आहे. अगोदर पैसे भरा नंतरच उपचार करु अशी भूमिका घेणाऱ्या रुग्णालयामुळे पांडुरंग रायकर यांच्यासह अनेक कोरोना बाधित रुग्णांची ससेहोलपट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त होतोय. भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी या रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी पुण्यात रायकर यांच्या उपचाराबाबत झालेल्या अनास्थेची देखील चौकशी करण्याची आणि कारवाईची मागणी केली.

राधाकृष्ण विखे म्हणाले, “टिव्ही 9 चे प्रतिनिधी पांडूरंग रायकर हे सरकारी अनास्थेचा बळी आहेत. कोपरगाव येथे आत्मा मालिक हॉस्पिटलने केलेली अडवणूक क्लेषदायी आहे. पुण्यातही रुग्णवाहिका मिळणे म्हणजे संतापजनक प्रकार आहे. सरकारचेच आरोग्य ठिकाणावर नाही, त्यामुळे जनतेचं आरोग्यही धोक्यात आलंय. हे सरकार फक्त चमकोगिरी करणारे सरकार आहे. कोपरगाव येथील रुग्णालयाची अडवणूक आणि पुण्यात झालेली अनास्था या प्रकारांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी.”

कोपरगाव येथील आत्मा मालिक हॉस्पिटल एव्हर हेल्दी समुहाकडून चालवले जाते. या रुग्णालयात अनेक रुग्णांकडून उपचारासाठी लूट केली जात असल्याचा आरोप होत आहे. महात्मा फूले आरोग्य योजनेत बसत असतानाही रुग्णालयाने रुग्णांकडून हजारो रुपये अनामत रकमेच्या नावाखाली उकळल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. टिव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी पांडूरंग रायकर यांना देखील रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि आडमुठेपणामुळे त्रासाला सामोरे जावे लागले.

पांडुरंग रायकर यांचा कोपरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर कोपरगावचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसौंदर यांनी रायकर यांना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. रिपोर्ट घेऊन ते आत्मा मालिक हॉस्पिटलला गेले असता तेथे रुग्णालय प्रशासनाने आधी 40 हजार रुपये भरा आणि त्यानंतरच दाखल करुन घेऊ, अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली. तसेच भरती करण्यास नकार दिला. रायकर यांना यावेळी श्वास घेण्यासाठी मोठा त्रास होत असताना रुग्णालयाने याकडे दुर्लक्ष केले.

पैसे भरण्याची तयारी दाखवूनही 2 तास गेटवरच ताटकळत ठेवलं

रायकर यांच्या सहकाऱ्यांनी काही रक्कम भरण्याची तयारी दर्शवूनही रुग्णालय व्यवस्थापनाने 2 तास त्यांना गेटवरच ताटकळत ठेवले. यानंतर पत्रकारांनी जिल्हाधिकारी आणि तहसिलदार योगेश चंद्रे यांना संपर्क केला. तेव्हा रुग्णालय प्रशासन जागे झाले. रुग्णांसोबत दैनिक भास्करचे कोपरगाव प्रतिनीधी मोबिन खान हे स्वतः होते. त्यांनी रुग्णालयाचे व्यवस्थापक अमित फडतरे यांना सांगून देखील त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मोबिन खान यांनी स्वतः हा धक्कादायक प्रकाराविषयी माहिती दिली आहे.

पत्रकार आणि सामाजिक संघटनेनी धारेवर धरल्यानंतर रुग्णालयाचं गेट उघडलं

कोपरगाव येथील पत्रकारांनी या समस्या जिल्हाधिकारी तसेच तहसिलदार यांना सांगितल्या तेव्हा रुग्णालयाच्यावतीने हालचाली सूरु झाल्या. मात्र रुग्णालयाकडून अधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवण्यात आली. अधिकाऱ्यांचे फोन झाल्यानंतर रुग्णालयाने रुग्णाला दाखल केल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर देखील अर्धा तास रुग्ण गेटवरच आहे त्या अवस्थेत होता. स्थानिक पत्रकार आणि सामाजिक संघटनेने धारेवर धरल्यानंतर रुग्णालयाचे गेट उघडून रुग्णाला दाखल करण्याचे नाटक करण्यात आले.

इतर रुग्णांकडूनही पैशांची मागणी करत अडवणूक

कोरोनाबाधित पत्रकारासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर तेथे उपचारासाठी आलेल्या मंदाबाई यांनी देखील रुग्णालयात आलेला असाच वाईट अनुभव सांगितला आहे. महात्मा फूले आरोग्य योजनेत बसलेल्या आजारासाठी त्यांना रुग्णालयाने 13 हजार भरण्यास सांगितले. पैसे भरण्यास असमर्थ ठरल्याने मंदाबाईंना आता उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याची वेळ आलीय. योजनेत ह्दयाची अँजीओग्राफी तसेच पुढील उपचार मोफत दिले जातात तरीही पिवळे रेशनकार्ड असलेल्या मंदाबाईंना रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. तेही पैशांची अडवणूक करत.

राज्य सरकारच्या आदेशान्वये कोणत्याही रुग्णावर पैशाअभावी उपचार थांबू नये असे आदेश असताना रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. रुग्णालयासोबत कुठेतरी प्रशासन देखील या आर्थिक लुटीत सहभागी आहे का? असा संशय त्यामुळे नागरिक व्यक्त करत आहेत. रुग्णांच्या बिल आकारणीत देखील रुग्णालयाकडून मोठी लूट होतेय, अशी तक्रार अनेक रुग्ण करत आहेत. ठाकरे सरकार अशा रुग्णालयांवर खरंच कारवाई करणार का? हाच प्रमुख प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

मागे

श्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात : राजेश टोपे
श्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात : राजेश टोपे

कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं ICU बेड वर ज....

अधिक वाचा

पुढे  

रेल्वे रुळाजवळील झोपड्या हटवणार, सर्वोच्च न्यायालयाने बजावले, 'राजकीय हस्तक्षेप नको'
रेल्वे रुळाजवळील झोपड्या हटवणार, सर्वोच्च न्यायालयाने बजावले, 'राजकीय हस्तक्षेप नको'

रेल्वेमार्गाजवळील झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायाल....

Read more