By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 08, 2020 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य -:
पाव किलो बाजरी, पाव किलो ज्वारी, शंभर ग्रॅम गहू, सव्वाशे ग्रॅम चणा डाळ, सव्वाशे ग्रॅम मटकी, ३ मोठे कांदे, १ लसूण कांदा, ८ ते १० हिरव्या मिरच्या, छोटा अर्धा चमचा हळद, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, १ छोटा चमचा जिरं, तेल, एक स्वच्छ सफेद पातळ कापड.
कृती -:
बाजरी, ज्वारी, गहू, चणा डाळ, मटकी हे सर्व गॅसवर मंद आचेवर स्वतंत्रपणे लाल होईपर्यंत भाजून घ्यावं. नंतर भाजलेल्या धान्याचं मिश्रण चक्कीवरुन बारीक दळून आणावं. त्यानंतर धान्याचे दळलेले मिश्रण चाळणीने चाळून घ्यावं. या मिश्रणात बारीक चिरलेले ३ कांदे, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ लहान चमचा जिरं, छोटा अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तसंच १ लसूण कांदा व ८ ते १० मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून टाकाव्यात. नंतर या मिश्रणात पाणी ओतून मिश्रण एकजीव करून घट्ट होईपर्यंत मळावं. पीठ मऊ होण्यासाठी त्यात एक छोटी पळी तेल ओतून १५ मिनिटं ठेवावं. नंतर गॅसवर तवा गरम होण्यास ठेवावा. मग एका पोळपाटावर सफेद रंगाचं ओलं कापड अंथरावं. त्यावर पिठाचा गोळा ठेवून हाताने गोलाकार थापून घ्यावा. त्यानंतर तव्यावर कालथ्याच्या साहाय्याने तेल पसरवून पोळपाटावरील भाकरी अलगद उचलून तव्यावर शिजण्यास ठेवावी. मग भाकरीच्या बाजूने थोडं तेल सोडावं, म्हणजे भाकरी पलटायला सोपी जाते. १ मिनीटभर शिजू देऊन नंतर कालथ्याच्या साहाय्याने भाकरी पलटून घ्यावी. पुन्हा थोडं तेल भाकरीच्या बाजूने सोडून त्यावर झाकण ठेवून, मंद आचेवर १ मिनीट भाकरी शिजू द्यावी. १ मिनिटानंतर भाकरी ताटात काढून घ्यावी. भाकरीवर साजूक तूप पसरवून टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत गरमा गरम आस्वाद घ्यावा. साजूक तुपामुळे भाकरीची लज्जत अधिकच वाढते.