ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तीन पक्षांच्या आघाडीमुळे समीकरणं बदलली, ऑपरेशन लोटस बारगळणार?; भाजपची डोकुदुखी वाढली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 04, 2020 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

तीन पक्षांच्या आघाडीमुळे समीकरणं बदलली, ऑपरेशन लोटस बारगळणार?; भाजपची डोकुदुखी वाढली

शहर : मुंबई

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांनी पदवीधरच्या 6 पैकी 4 जागांचं दान आघाडीच्या पदरात पाडल्यानं भाजपला सपशेल नाकारल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भाजपचं ऑपरेशन कमळ बारगळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर, आपलीच सत्ता येईल हे सरकार त्यांच्या अंतर्गत कलहामुळे कोसळेल अशा वल्गना करणाऱ्या भाजपासमोर आता इतर पक्षातून आलेल्या नेत्यांनाच थोपवून धरण्याचं आव्हान उभं राहिल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक होती. शिवाय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवलेलीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपची निवडणूक जिंकण्यासाठीची रणनीती यशस्वी होणार की दोन वेगळ्या विचारधारेच्या आघाडीला मतदार स्वीकारतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप या नव्या समीकरणावर पहिल्यांदाच मतदान झालं आणि त्यात महाविकास आघाडीला लोकांनी स्वीकारल्याचं दिसून आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांकडे मतं ट्रान्सफर करून एकी दाखवली असून आघाडीत बेबनाव नसल्याचंही दिसून आलं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर असून पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. तर, धुळे-नंदूरबार पदवीधरमध्ये भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला केवळ एकच जागांवर विजय मिळाला असून हा विजयही पटेल यांच्या वैयक्तिक करिष्म्यामुळे शक्य झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

55 वर्षांपासूनचा गड ढासळला

महाविकास आघाडीच्या एकीमुळे भाजपला नागपूरमध्ये प्रचंड मोठा धक्का बसला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ गेल्या 55 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होता. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा गड म्हणून नागपूरला ओळखले जाते. पण या गडाला सुरुंग लावण्यात काँग्रेसला यश मिळाले आहे. प्रत्येकवेळी ऐनवेळी उमेदवारी जाहीर करणं, त्यामुळे होणारं नाराजीनाट्य आणि दुसरीकडे भाजपची सुनियोजित रणनीती आदी कारणांमुळे नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा पराभव पत्करावा लागत होता. मात्र, यावेळी काँग्रेसने अभिजीत वंजारी यांना दीड वर्षापूर्वीच तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे वंजारी यांनी गेल्या दीड वर्षांपासून कामाला सुरुवात केली होती. त्यातच शिवसेनेची साथ मिळाल्याने भाजपच्या गडाला सुरुंग लावणं त्यांना सोपं गेलं आहे.

मुंबई महापालिका ते जिल्हा परिषद निवडणुका भाजपचे काय होणार

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या लिटमस टेस्टमध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाल्याने या आघाडीचं बळ वाढलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसह राज्यातील 10 महापालिका आणि 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही ही आघाडी एकत्रित दिसणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. शिवाय तोपर्यंत इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना थोपवून धरण्याची तारेवरची कसरतही भाजपला करावी लागणार आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पराभव समोर दिसू लागल्याने भाजपनेही महाविकास आघाडीच्या एकसंघतेमुळे हा पराभव झाल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढावं त्यानंतरचे निकाल पाहावे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

ऑपरेशन लोट्स बारगळलं?

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील यशानंतर राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात होतं. भाजपचे नेते नारायण राणे यांनीही राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोट्स होणार असल्याचं म्हटलं होतं. तर पदवीधरांच्या रणधुमाळीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेत दिले होते. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील यशानंतर भाजपकडून राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागल्याने भाजपची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन लोटस होणार की भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मागे

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून सर्वस्व पणाला!
विधान परिषदेच्या 6 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून सर्वस्व पणाला!

राज्यातील विधान परिषदेच्या 6 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणी....

अधिक वाचा

पुढे  

‘लोकहो, शेतकरी मरत आहे’!, रोखठोकमधून संजय राऊतांचं महाराष्ट्रवासियांना आवाहन
‘लोकहो, शेतकरी मरत आहे’!, रोखठोकमधून संजय राऊतांचं महाराष्ट्रवासियांना आवाहन

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 19वा दिवस आहे. आता लवकरच या आंदोलनावर तोडगा नि....

Read more