By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
‘चौदाव्या शतकात देवगिरी राज्यावर राजा रामदेव राज्य करत होता. यवन सम्राट (बादशहा) अल्लाउद्दीनने देवगिरीवर चढाई केली आणि राजाला शरण येण्यास सांगितले; पण पराक्रमी रामदेवने त्याचा धिक्कार केला. त्यामुळे अल्लाउद्दीन संतापला आणि प्रचंड सैन्यानिशी देवगिरीवर चालून गेला. देवगिरीचा गड अभेद्य होता आणि त्यावरीलसैन्य युद्ध पारंगत होते.त्यामुळे अल्लाउद्दीनचे सैन्य टिकाव धरू शकले नाही. त्याच्याशी दोन हात करतांना अल्लाउद्दीनचे असंख्य सैनिक मारले गेले. त्यामुळे त्याला पराभव पत्करून मागे फिरावे लागले. त्या वेळी देवगिरीवरमोठा विजयोत्सव साजरा झाला.
राजा रामदेवाच्या सैन्यातील एका पराक्रमी सरदारास पूर्वीच्या एका युद्धात वीरमरण आले होते. त्याची मुलगी वीरमती हिला राजाने स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले आणि ती उपवर होताच कृष्णराव नामक एका तरुणासमवेत तिचा विवाह निश्चित केला. हा कृष्णराव अतिशय स्वार्थी आणि लोभी होता. पराभव पत्करून अल्लाउद्दीन मागे परतत असतांना या कृष्णरावने त्याची भेट घेतली. विजय मिळाल्यावर अल्लाउद्दीनने त्यास ‘देवगिरीचा राजा बनवावे’, या अटीवर त्यास देवगिरी गडाचे रहस्य आणि त्यावरील सैन्यबलाची संपूर्ण माहिती दिली. अल्लाउद्दीन पुन्हा मागे फिरला आणि देवगिरीवर चालून आला.
ते वृत्त कानी पडताच राजा रामदेवाने त्वरेने हालचाल केली आणि आपल्या सर्व सरदारांची सभा बोलावून म्हणाला, ‘‘काहीतरी विशेष सूचना मिळाल्याविना पराजित होऊन गेलेला शत्रू पुन्हा आक्रमण करत नाही. याचा अर्थ आपल्यापैकीच कोणीतरी त्याला फितूर झालेला आहे; पण चिंतेचे कारण नाही. आपण त्याला पुन्हा हरवू.’’ ते ऐकून सर्वांनी आपापल्या तलवारी बाहेर काढल्या आणि म्हणाले, ‘‘या युद्धात आम्ही प्राणपणाने लढू आणि देवगिरीचे रक्षण करू.’’ त्या वेळी कृष्णराव काहीच बोलला नाही. त्यामुळे इतरांना त्याचे मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी त्याला गप्प बसण्याचे कारण विचारले. तेव्हा ‘हा देशद्रोही आहे’, असे म्हणून वीरमती चवताळलेल्या वाघिणीसारखी त्याच्या अंगावर धावली आणि विजेच्या चपळाईने कटीची तीक्ष्ण कट्यार उपसून त्याच्या छातीत खुपसली. वीरमतीला कृष्णरावच्या प्रामाणिकपणाविषयी प्रथमपासूनच संशय होता; म्हणूनच तिने त्याच्यावर गुप्त पाळत ठेवली होती. तो अल्लाउद्दीनला मिळाल्याचे समजताच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. तिला त्याच्या पापाचे शासन त्याला करायचे होते. संधी मिळताच तिने त्याला धडा शिकवला.
मरता मरता कृष्णराव म्हणाला, ‘‘मी देशद्रोही असलो, तरी तुझा पती …’’ तेव्हा वीरमती म्हणाली, ‘‘माझा तुमच्याशी विवाह होणार होता आणि मीही मनाने तुम्हालाच वरले होते. हिंदू स्त्रीच्या मनाने एकाला पती मानले की, ती दुसर्या पुरुषाचा विचार करत नाही. तुमच्यासारख्या देशद्रोह्याला मारून मी देशकर्तव्य केले आहे. आता पत्नीच्या धर्माचे पालन करते’’, असे म्हणून तिने तलवार उपसली आणि स्वतःच्या पोटात खुपसली. दुसर्याच क्षणी ती गतप्राण होऊन कृष्णरावाच्या शवापाशी कोसळली.’