By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2021 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या गावातील खानापूर ग्रामपंचायत गमवावी लागली आहे. त्यामुळे पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. मात्र, पाटील यांनी हा दावा सपशेल फेटाळून लावला आहे. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. खानापूरमध्ये सहा पैकी तीन जागा आम्ही जिंकल्या आहेत. दोन जागांवर कमी मताने आम्ही पराभूत झालो आहे. पण तरीही गावाने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असं सांगतानाच एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आहे, असं पाटील म्हणाले.
स्वबळावर लढून पाहाच
राज्यात तीन पक्षाचं कडबोळं सत्तेत आहे. मी पहिल्यापासून सांगतो चारही पक्षांनी स्वबळावर लढावं, मग पाहा आम्हीच नंबर वनला असू. राज्यातील आघाडी सरकारला झेंडाही नाही आणि अजेंडाही नाही, अशी टीका त्यांनी केली. ग्रामपंचायतीत निवडून आलो म्हणजे जिंकलो असं होत नाही. त्या ग्रामपंचायतीवर सरपंच निवडून आला तरच ग्रामपंचायत हातात आली असं म्हणता येतं, असं सांगतानाच संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायतीचं चित्रं स्पष्ट होईल. त्यावेळी आमचीच संख्या जास्त असेल, असा दावाही त्यांनी केला.
कोल्हापुरातील खानापूर हे चंद्रकांत पाटील यांचं मूळगाव आहे. पण खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने 9 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. अजून तीन जागांची मतमोजणी सुरू आहे. शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरातच पराभूत केल्याने पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. या निमित्ताने भाजपला नाकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचंही बोललं जात आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण सुरु झाल्यापासून प्रख्यात व्हायरोलॉजिस्ट आणि ख्र....
अधिक वाचा