ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"लोकल बंद झाली अन् माझ्या संसाराचा कणाच मोडला; उभ्या आयुष्यात पुन्हा लोकल बंद होऊ नये!"

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2020 10:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मुंबईसह उपनगरांमधील आणि मुंबई शेजारी असणाऱ्या जिल्ह्यांमधील नागरिक आपलं पोट भरण्यासाठी दररोज मुंबईत दाखल होत असतात, आणि रात्री पुन्हा आपल्या घरी निघून जातात. त्यांची ने-आण करण्यासाठी मुंबईची लोकल ट्रेन हा सर्वात मोठा दुवा आहे. मात्र कोरोनाचे संक्रमण वाढल्यामुळे केंद्र सरकारने लोकल सेवा बंद केली आणि मुंबईवर आपलं पोट भरणाऱ्या लाखो महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. कालपासून पुन्हा लोकल सेवा सुरु झाल्यामुळे या लाखो महिलांच्या डोळ्यांमध्ये पुन्हा जिद्द आणि आशेचा किरण दिसू लागला आहे.

संपूर्ण भारतामध्ये मार्च महिन्यापासून कोरोनाचं संक्रमण वाढत चाललेलं होतं. यामध्ये लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामध्ये प्रामुख्याने मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकल सेवा बंद केल्यामुळे मुंबईकरांचे हाल होणार हे निश्चित होतं. कोरोनाच्या काळातील चार महिने लॉकडाऊनमध्ये मुंबईकर महिलांनी कसेबसे दिवस काढले. लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यानंतर आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून दररोज लाखो महिला मुंबई , उपनगर आणि मुंबई शेजारी असणाऱ्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या कामांसाठी मुंबईत दररोज दाखल होत होत्या. मात्र लोकल सेवा सुरु नसल्यामुळे दररोज सहा ते सात तासांचा बसचा प्रवास सहन करत या महिला जिद्दीने आपला दररोजचा प्रवास करत होत्या. अनेक महिलांचे संसार हे त्यांच्या कामावरच अवलंबून होते. त्यामुळे आपला संसार टिकविण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी या महिला रात्रंदिवस काबाडकष्ट करत मुंबईत दाखल होत असतात. लोकल सेवा बंद असल्यामुळे महिलांकडून वारंवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे लोकलसेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र कोरोना संकट पाहता ही मागणी लवकर मान्य होईल अशी परिस्थिती नव्हती.

ठाकरे सरकारने राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने अनलॉक करत अनेक गोष्टींना परवानगी दिल्या. मात्र मंदिर आणि लोकल सेवा यांना परवानगी देण्यात आली नव्हती. नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने महिलांना लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. आजपासून सकाळी अकरानंतर सर्व महिलांसाठी लोकल सेवा सुरु झाली. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून महिलांसाठी बंद असलेली लोकलसेवा आता सुरु झालेली आहे. त्यामुळे बस मधून सहा-सात तास प्रवास करत हाल-अपेष्टा सहन करणाऱ्या महिलांनी आनंद व्यक्त केलेला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली लोकल सेवा सुरु झाल्यासंदर्भात बदलापूरहून प्रवास करणाऱ्या रोहिणी सावंत म्हणाल्या की, 'मी गेली चार वर्ष बदलापूरहून सीएसटीला एका खाजगी कंपनीत कामासाठी येत आहे. घरामध्ये मी एकटीच कमावणारी आहे. त्यामुळे मला काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लोकल सेवा बंद झाली होती. यामध्ये आम्हाला कामावर येण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता. गेली दीड महिने मी बसने प्रवास करत आहे. मात्र या प्रवासामध्ये कामाचे आठ तास आणि प्रवासाचे सहा तास जात असल्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास मला मोठ्या प्रमाणात जाणवत होता. लवकरात लवकर लोकलसेवा सुरु व्हावी अशी मागणी करण्यात येत होती. आजपासून लोकल सेवा सुरु झाल्यामुळे मी ही सकाळी या लोकलने सीएसटीला आले. आजचा दिवस हा माझ्यासाठी खास असेच म्हणावे लागेल. कारण पुन्हा एकदा मी माझ्या कामावर रुजू होते. आणि पुन्हा वेळेत संध्याकाळी मी लोकलने घरी जाऊ शकते.'

तसेच लोकल सेवा सुरु झाल्याबाबत आनंद व्यक्त करत दररोज कल्याण ते सी. एस.टी. असा प्रवास करणाऱ्या आसावरी पाटील म्हणाल्या की, 'लोकल बंद झाली आणि माझ्या संसाराचा कणाच मोडला, पुन्हा उभ्या आयुष्यात लोकल बंद होऊ नये अशी प्रार्थना मी देवासमोर केलेली आहे. कारण मी काम केलं तरच माझं घर चालतं. परिस्थितीने मी खूप हतबल झालेली आहे . मुलांच्या शिक्षणासाठी आणि माझा संसार व्यवस्थित चालावा यासाठी मी घरातून बाहेर पडते. दररोज कल्याण ते सीएसटी प्रवास करते. सीएसटीला मी एका खाजगी कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट आहे. गेली अनेक वर्ष मी लोकल ट्रेन ने प्रवास करत आहे. मात्र सलग चार ते पाच महिने लोकल सेवा बंद पडेल असं कधीच स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. कोरोना आला आणि अनेक समस्या निर्माण झाल्या. या कालावधी मध्ये माझ्या पतीची नोकरीही गेली. सध्या ते कामाच्या शोधात आहेत. गेली चार महिने आम्ही घरीच असल्यामुळे आम्हाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे . पुन्हा अशी परिस्थिती आमच्यावर येऊ नये यासाठी मी दररोज देवाकडे हात जोडत आहे.'

मागे

बिहारमध्ये 7 वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्याला कंदिवलीत अटक
बिहारमध्ये 7 वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्याला कंदिवलीत अटक

बिहारमध्ये एका सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन त्याच्या कुटुंबीयांकडे मु....

अधिक वाचा

पुढे  

देशातील गोदामं अन्नधान्यांनी भरलेली असताना सरकार जनतेला उपासमारीने का मारतंय? राहुल गांधींचा सवाल
देशातील गोदामं अन्नधान्यांनी भरलेली असताना सरकार जनतेला उपासमारीने का मारतंय? राहुल गांधींचा सवाल

जागतिक उपासमारी निर्देशांकाच्या यादीत भारत 94 क्रमांकावर असल्याच्या गोष्ट....

Read more