ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं 55 वर्षाचं नातं संपवत आहे… हाती भगवा घेताच मिलिंद देवरा भावूक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 15, 2024 06:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं 55 वर्षाचं नातं संपवत आहे… हाती भगवा घेताच मिलिंद देवरा भावूक

शहर : मुंबई

केंद्र आणि राज्यात मजबूत सरकारची गरज आहे. केंद्रात मोदींच्या नेतृत्वात भारत मजबूत आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र मजबूत आहे, सुरक्षित आहे. लोकांना सहज भेटणारा एवढा मोठा मुख्यमंत्री मी कधीच पाहिला नाही. गेल्या दहा वर्षात मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. हे केवळ मोदी आणि शिंदे यांच्या धोरणांमुळे हे शक्य झालं, असं मिलिंद देवरा म्हणाले.

आजचा दिवस माझ्यासाठी भावूक आहे. इमोशनल आहे. मी काँग्रेस सोडेल असं वाटलं नाही. मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबतचे 55 वर्षाचे जुने नाते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात संपवत आहे. माझं राजकारण नेहमीच सकारात्मक आणि विकासाचं राहिलं आहे. विधायक राहिलं आहे, असं माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा म्हणाले. माझी विचारधारा सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आहे. आम्हा सर्वांना अभिमान आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत मेहनती आहेत. सर्वांना उपलब्ध असतात. जमिनीवरचे नेते आहेत. सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना माहीत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचं त्यांचं व्हिजन मोठं आहे. त्यामुळे मला त्यांचे हात बळकट करायचे आहेत. यशस्वी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे देशाचं व्हिजन आहे. त्यामुळे मला शिवसेनेचे हात मजबूत करायचे आहेत, असं मिलिंद देवरा म्हणाले.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वर्षा निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांच्या हाती भगवा झेंडा देत पक्षात प्रवेश दिला. यावेळी मिलिंद देवरा यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. सामान्य कार्यकर्त्यांसह व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. यावेळी खासदार राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर उपस्थित होते.

महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांनीही प्रवेश केला. माजी नगरसेवक सुनील नरसाळे, प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेवक रामबच्चन मुरारी, माजी नगरसेविका हंसा मारू, माजी नगरसेविका अनिता यादव, रमेश यादव, प्रकाश राऊत, मारवाडी संमेलन के अध्यक्ष अॅड. सुशील व्यास, पूनम कनौजिया, डायमंड मर्चंटचे संजय शाह, दिलीप साकेरिया, निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर, वराय मोहम्मद, सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राजाराम देशमुख, प्रशांत झवेरी, समर्थलाल मेहता, सौरव शेट्टी, अॅड. त्र्यंबक तिवारी, कांती मेहता, उदेश अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, कैलास मुरारका, आदींनी आज शिवसेनेत प्रवेश केला. 85 वर्षाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरारजीभाई मोतीचंद यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

माझ्यावर विश्वास टाकला

पक्षात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आमचे शिवसेनेशी जुने नाते आहेत. माझे वडील मुरली देवरा हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुंबईचे महापौर झाले. माझे आईचे माहेरचे नाव फणसाळकर असल्याने बाळासाहेब मुरली भाईंना प्रेमाणे महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. माझे वडील आणि शिंदे यांच्यात एक समानता आहे. दोघेही सामान्य कुटुंबातून आले आहेत. दोघांनीही नगरसेवक म्हणून सुरुवात केली. मुरलीभाई केंद्रात मंत्री झाले. तुम्ही मेहनतीने मुख्यमंत्री झाला. माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी मला शिंदे यांनी पक्षात प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं. शिंदे साहेबांना मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत. मी खासदार बनून चांगलं काम करू शकतो, असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे. त्यांनी विश्वास टाकला. त्याबद्दल आभार मानतो, असं मिलिंद देवरा म्हणाले.

केवळ मोदी विरोध हाच अजेंडा

माझ्यासोबत काही मराठी भाषिक, काही हिंदी भाषिकही आहेत. सकाळपासून अनेक लोकांचा फोन येत आहे. तुम्ही कुटुंबासोबतचं नातं का तोडलं असं सांगितलं जात आहे. मी पक्षाच्या आव्हानाच्या काळातही पक्षाशी निष्ठावंत राहिलो. पण दुखाची गोष्ट म्हणजे आजची काँग्रेस आणि 1968च्या काँग्रेसमध्ये खूप फरक आहे. मेरिट आणि योग्यतेला काँग्रेसने महत्त्व दिलं असतं तर मी इथे बसलो नसतो. एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ्यावा लागला. मलाही घ्यावा लागला. 30 वर्षापूर्वी मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री असताना आर्थिक सुधारणा केली होती. त्यावेळी काँग्रेसने केवळ उद्योगपतींना शिव्या घातल्या. उद्योगपतींना देशद्रोही म्हटलं. आज हीच पार्टी मोदींच्याविरोधात बोलत आहे. उद्या मोदींनी काँग्रेस चांगला पक्ष आहे असं म्हटलं तर त्यालाही विरोध करतील. केवळ मोदी विरोध हाच या पक्षाचा अजेंडा राहिला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मागे

 ‘मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
‘मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे....

अधिक वाचा

पुढे  

ठाकरे कुटुंबाची सुरक्षा केंद्र सरकारची जबाबदारी – संजय राऊत
ठाकरे कुटुंबाची सुरक्षा केंद्र सरकारची जबाबदारी – संजय राऊत

"वरळी डोम येथे उद्धव ठाकरे यांची काही कायदेपंडितांसोबत महापत्रकार परिषद ....

Read more