ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवतीर्थ सज्ज, कोण कोण शपथ घेणार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 05:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवतीर्थ सज्ज, कोण कोण शपथ घेणार?

शहर : मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित राहणार आहेत.

जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, त्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या साक्षीने हा शपथविधी रंगणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील. उद्धव ठाकरे शपथ घेण्यापूर्वी शिवरायांच्या पुतळ्याला क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार अर्पण करतील.

शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोरच सहा हजार चौरस फुटांचं भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. मंचावर 300 जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे. शिवाजी पार्क परिसरात एक हजार गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कानाकोपऱ्यात 20 एलईडी लावले गेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीलाही पुष्पआरास करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंसोबत कोण शपथ घेणार?

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

निमंत्रितांमध्ये कोण?

उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे राज ठाकरे सहकुटुंब शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, माजी पंतप्रधान एच. के. देवेगौडा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना आदित्य ठाकरे यांनी स्वतः दिल्लीला जाऊन निमंत्रण दिलं. सोनिया गांधी उपस्थित राहिल्यास चांगला संदेश जाईल, अशी काँग्रेस नेत्यांची धारणा होती, परंतु सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणं जमणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उद्धव ठाकरे यांनी फोन करुन आमंत्रित केलं. मोदींनी उद्धव यांना शुभेच्छा देत अभिनंदन केलं.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रमाणे विविध देशांच्या राजदूतांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. शेतकरी ते वारकरी, विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही सोहळ्यासाठी आमंत्रित आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त  ठेवण्यात येत आहे.

मंत्रिमंडळाचं संभाव्य वाटप

शिवसेना

11 कॅबिनेट + 4 राज्यमंत्री + 1 मुख्यमंत्रीएकूण 16

राष्ट्रवादी

11 कॅबिनेट (उपमुख्यमंत्रिपदासह) + 4 राज्यमंत्रीएकूण 15

काँग्रेस

9 कॅबिनेट + 3 राज्यमंत्रीएकूण 12 + विधानसभा अध्यक्षपद

गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता (राष्ट्रवादी)

महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता (काँग्रेस)

नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची शक्यता (शिवसेना)

ग्रामीण भागाशी संबंधित कृषी, सहकार, ग्राम विकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात

शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य दावेदार

शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांची नगरविकास मंत्रिपदी वर्णी लागू शकते. तर सुभाष देसाई यांना उद्योग, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय उदय सामंत यांना गृहनिर्माण मंत्रिमंडळाचा कारभार कारभार दिला जाण्याची माहिती मिळत आहे.याव्यतिरिक्त दादा भुसे, अनिल परब, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, दिवाकर रावते, दीपक केसरकर, रामदास कदम, बच्चू कडू, अंबादास दानवे या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसमधून संभाव्य नावं कोणाची?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची चिन्हं आहेत. तर कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे.नवाब मलिक यांना कामगार मंत्रालय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महसूल खात्याचा कारभार दिला जाण्याचे संकेत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी या काँग्रेस आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

 

 

        

मागे

समान किमान कार्यक्रम जाहीर; ५०० चौरस फुटांचे घर, १० रुपयांत जेवण आणि कर्जमाफी
समान किमान कार्यक्रम जाहीर; ५०० चौरस फुटांचे घर, १० रुपयांत जेवण आणि कर्जमाफी

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील युतीचा आधार ठरलेला महाविकास....

अधिक वाचा

पुढे  

संजय राऊत यांना वाय दर्जाची सुरक्षा
संजय राऊत यांना वाय दर्जाची सुरक्षा

शिवसेनेचे खासदार आणि दै.’सामना’ चे संपादक संजय राऊत यांच्या सुरक्षा व्य....

Read more