ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कणकवलीत उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 07:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कणकवलीत उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल

शहर : मुंबई

विधानसभा निवडणूक २०१९ च्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कणकवलीच्या रणांगणात दाखल झाले. इथं त्यांनी जाहीर सभेतील आपल्या भाषणात भाजपात 'स्वाभिमान' विलीन करणाऱ्या नारायण राणेंचा चांगलाच समाचार घेतला. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सामंत यांनी दंड थोपटलेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज कणकवलीत जाऊन नारायण राणेंवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. 'नारायण राणे ही पाठित वार करणाऱ्याची औलाद आहे' असं सांगत भाजपानं त्यांच्यापासून सावध राहावं असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला. राणेंची गुंडगिरी संपवून सिंधुदुर्गात भगवा फडकवा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं. जे मातोश्रीच्य़ा मिठाला जागले नाहीत अशा खुनशी प्रवृत्तीची माणसं भाजपात नकोत असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी भाजपाला दिला. राणेंच्या भाजपा प्रवेशानं 'स्वाभिमान' हा शब्द आज मुक्त झाला असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

'राणे गेले तिथं वाट लावली' अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी या सभेत केली. यावेळीच, भाजपाशी किंवा कुणाशीच आपली 'दुष्मनी' नाही, हे उद्धव ठाकरेंना आवर्जुन आपल्या भाषणात सांगावं लागलं. पण, त्याचवेळी 'दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर मोडून-तोडून काढू' असा इशाराही त्यांनी आपल्या विरोधकांना दिला. 'नाणार'सारखा प्रकल्प आपल्याला नकोय, असंदेखील त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

'मुख्यमंत्री काल येऊन गेले... तुमचा आमचा लढा नाही, दुष्मनी नाही... पण काही गोष्टी सांगाव्या लागतात, मित्राला सावध करावे लागते' असं म्हणत त्यांनी भाजपाला सावधानतेचा इशारा दिला. 'राणेंनी काँग्रेस सोडली तेव्हा मला प्रतिक्रिया विचारली गेली... मी म्हटलं सोनिया गांधी आणि काँग्रेसला शुभेच्छा... तशा आज मी भाजपाला शुभेच्छा देतो... हे अनुभवाचे बोल आहेत' असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण भाषणात त्यांनी नुकतेच भाजपावासी झालेल्या नारायण राणेंवर हल्लाबोल केला. 'राम मंदिर सुनावणी पूर्ण झाली आणि निकाल राखून ठेवला आहे... त्यावरून मला रामायणातील राक्षस आठवले... या राक्षसाला (राणे) गाडला तो काँग्रेसमध्ये जाऊन उभा राहिला... तिथून काढला तरी उभा राहिला... पण आता शेवटचे आहे... आता गाडला तर पुन्हा उठून उभा राहणार नाही... शिवसेना सोडली तेव्हा शिवसेनेला शिव्या, काँग्रेस सोडताना काँग्रेसला शिव्या, स्वाभिमान सोडताना एकमेकांना शिव्या दिल्या असतील... भाजपात काही मिळाले नाही तर त्यांनाही शिव्या देतील' असं म्हणत त्यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका केली.यावेळी, भाजपाला चुचकारण्याची संधीही त्यांनी साधली. 'रमेश गोवेकरांचे काय झाले? सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक, अंकुश राणे यांचं काय झालं? हे भाजपाचे जुने-जाणते होते. तरी त्यांना उमेदवारी दिली गेली नाही... तसं घडलं असतं तर आजची ही युतीची भव्य सभा झाली असती' असं म्हणत त्यांनी भाजपाच्या नाराज नेत्यांनाही उकसावण्याचा प्रयत्न केला.

 

मागे

भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा
भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा

आमदारांच्या कामाचा पंचनामा करताना बऱ्याच वेळा लोक आक्रमक होतात. नेते फक्त ....

अधिक वाचा

पुढे  

'खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी'- रामदास आठवले
'खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी'- रामदास आठवले

शरद पवार साहेब कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असले तरी ते कुस्ती खेळू शकत नाही....

Read more