ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड

शहर : मुंबई

गेल्या महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा एण्ड झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बहुमत चाचणी पास केली आहे. पण पडद्यामागे काय नाट्य झालं? या सगळ्याची स्क्रीप्ट कोणी लिहीली? हे आता समोर येऊ लागलं आहे.

होय, मला दिव्यदृष्टी आहे, हे ज्यानं सिद्ध केलं, ते संजय राऊत. त्यांनीच खऱ्या अर्थानं कुरुक्षेत्रावर शंख फुंकला आणि त्या शंखनादानं युतीला हादरे बसायला लागले. भाजपला अंगावर घेणं सोपं नव्हतं, पण राऊतांनी घेतलं. सतत बोचऱ्या बाणांनी भाजपला घायाळ करत राहिले. सत्तास्थापनेच्या या खेळात सर्वाधिक वाईटपणा कुणी घेतला असेल तर तो राऊतांनी. शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी पवारांशी सातत्यानं संवाद, भाजपवर दररोज सपासप शाब्दिक वार आणि सामनामधून जनसामान्यांचं मनपरिवर्तन करणारी धारदार लेखणी, या तीनही महत्त्वाच्या आघाड्यांवर राऊतांनी कमाल केली आणि खऱ्या अर्थानं सामनावीर ठरले ते राऊतच. याचसाठी केला होता अट्टाहास हे राऊतांसाठी फळाला आलं.

या सत्तानाट्यासाठी गरज होती ती एका निष्णात दिग्दर्शकाची. नन अदर दॅन, वन अँड ओन्ली शरद पवार... शरद पवार... शरद पवार..... मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी पाटी लागली असली तरी पवारच या सरकारमधले सुपर सीएम म्हटलं, तर ते वावगं नाही. नव्या सरकारसाठी किंगमेकर ठरले ते शरद पवारच. महाराष्ट्रात सत्ताबद्दल व्हायलाच हवा, हे सगळ्यात आधी मातोश्रीला पटवून द्यावं लागलं.

मागच्या सरकारच्या काळात केंद्राकडून सर्वाधिक निधीचा ओघ महाराष्ट्रापेक्षा गुजरातकडे वळवण्यात आला. भाजपचं धोऱण छोट्या राज्यांचं असल्यानं भविष्यात वेगळ्या विदर्भाचा घाट घातला जाईल. गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक निधी विदर्भाकडे वळला. नारपारचं पाणी पळालं, बीकेसीमधलं एक्सिबिशन सेंटर रद्द झालं, एकेक करत महाराष्ट्राच्या रिसोर्सेसवर मोठा परिणाम झाला.

बुलेट ट्रेनमध्ये बसून गुजरातच्या व्यापाऱ्यांचं भलं होईल, आर्थिक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या मुंबईतला पैसा हळूहळू गुजरातकडे वळेल... शिवसेनेचा प्राण म्हणजे मुंबई महापालिका.... तिथली सत्ता गेली तर शिवसेनेचं अस्तित्वच डळमळीत होईल.... मग ना रहेगी शिवसेना ना रहेगा महाराष्ट्र, अशी अवस्था होईल. हे पवारांना उद्धव ठाकरेंना समजवावं लागलं. पटवून द्यावं लागलं आणि मगच, होय सत्तापालट घडवावाच लागेल, हा उद्धव ठाकरेंचा निर्धार झाला.

मातोश्री तयार झाल्यावर पवारांची पुढची मोहीम होती दिल्ली. त्यासाठी पवारांनी निवड केली एका अतिशय हुशार, अनुभवी आणि दिल्लीत वजन असलेल्या नेत्याची. पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाणांची निवड करण्य़ाचा दुहेरी फायदा होता. एक म्हणजे या नेत्यावर सोनियांचा प्रचंड विश्वास आणि दुसरा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध.

आधीची कटुता विसरुन एकत्र यायलाच हवं, हे पवारांनी चव्हाणांना पटवून दिलं. सिल्व्हर ओकवर शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात अशी बैठक झाली. याच बैठकीत पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना निरोप दिला... जाओ और दिल्लीका साईन लेके आओ.

मॅडम मानेगी की नही, यावर पुढचं सगळं ठरणार होतं. काँग्रेसच्या विशिष्ठ  संस्कृतीचं काटेकोर पालन करणाऱ्या सोनिया गांधी आणि दिल्लीतल्या काँग्रेस धुरीणांना महाराष्ट्राच्या सत्तेत सामील करुन घ्यायचं होतं. टोकाच्या विचारधारा असलेल्या दोन पक्षांना कुणाचीही मनं दुखावता चर्चेसाठी एका टेबलवर आणायचं होतं.

प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे. एका मोठ्या राज्याचा आहे, आम्ही सत्ता बनवतोय. तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल हे शरद पवारांनी सोनियांना पटवून दिलं. शिवसेनेबरोबर जायचं म्हणजे अर्थातच सगळ्याच गोष्टी तावून सुलाखून घेतल्या. सोनियांनी महाराष्ट्रातल्या आमदारांशी संवाद साधला. अखेर  काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्नल मिळाला.

दिल्लीचं वारं अचूक ओळखणारी आणि बाबांना हवं ते कसं जुळवून आणायचं, याचं जन्मतःच बाळकडू मिळालेली एकच व्यक्ती... सुप्रिया सुळे. राष्ट्रवादीच्या गोटात थोडी चलबिचल होती. शिवसेनेपेक्षा भाजपबरोबर सतेत गेलेलं बरं, असा राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याचा आग्रह होता. त्या नेत्याशी भाजपची बोलणीही सुरू होती.

भाजपबरोबरची जाण्याची ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची चुळबूळ शांत करण्याची जबाबदारी होती सुप्रिया सुळेंवर.... महाराष्ट्राच्या या सत्तानाट्याचा अंक आकार घेत असताना राहुल गांधींना त्यासाठी राजी करणं आणि याविरोधात जाईल किंवा पक्षात संभ्रम निर्माण होईल असं ट्विट किंवा विधान राहुल गांधींकडून होणार नाही, याची काळजी घेतली सुप्रिया सुळेंनी.एकीकडे ताई या कामात गर्क असताना तिकडे दादांच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरू होतं. सत्तानाट्याचा हा प्रयोग यशस्वी होणार असं वाटत असतानाच. त्या शनिवारी सक्काळी सक्काळी सगळ्यांची झोप उडाली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. डोळ्यांवर विश्वास बसायलाही कठीण असं हे दृश्यं होतं. सारं काही जुळून येत असतानाच अजित पवारांनी बंड केलं होतं. या बंडाचं मूळ दडलं होतं ते राष्ट्रवादीच्या १७ नोव्हेंबरच्या पुण्याच्या बैठकीत. याच बैठकीत शिवसेनेबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय झाला होता. कारण दगडापेक्षा वीट मऊ, यावर एकमत झालं होतं. आणि नेमकं हेच अजितदादांना पटलं नव्हतं. तरीही महाविकासआघाडीच्या बैठकांमध्ये अजित पवार जात होते. शुक्रवारी नेहरु सेंटरमधल्या त्या बैठकीत मात्र अजितदादांची चलबिचल सुरू झाली. कारण उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदावरुन बराच घोळ या बैठकीत झाला. तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणत शरद पवारही बैठकीतून उठून गेले आणि मग पाठोपाठ दादांच्या डोक्यात तिडीक गेली. फडणवीस आधीपासून अजित पवारांच्या संपर्कात होतेच. पण त्या शुक्रवारी संध्याकाळी भाजप श्रेष्ठींनी अजित पवारांना गळाला लावलं. तुम्ही या की आमच्याबरोबर, पाठोपाठ तुमचे काकाही येतील.

पवारसाहबसेभी हमारी बातचीत शुरू है. बस सुबह एक फोन करना बाकी है. सब ठीक हो जाएगा, असा विश्वास अजित पवारांना देण्यात आला. आणि पुढचं ते उषःकालच्या शपथविधीचं नाट्य घडलं. पण ज्या क्षणी धनंजय मुंडे पवारांकडे परतले त्या क्षणी अजित पवारांचं बंड फसलं. सुबह का भुला शाम को वापस आए तो उसे भुला नही कहते, असं राष्ट्रवादीच म्हणू लागली.बंड शमलं, किलमिषं दूर झाली. टोकाची विचारधारा असणारे एकत्र आले आणि महाविकासआघाडी नावाचा एक भन्नाट प्रयोग अवघ्या देशानं पाहिला. या कथेत आणखी एक 'सिक्रेट सुपरस्टार' अर्थात महत्त्वाचा नायक होता.

विश्वासदर्शक ठरावावेळी खुल्या पद्धतीनं मतदान होईल, त्याची व्हिडीओग्राफी होईल, हा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आणि महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातले फासे फिरले. उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यानंतर विधानसभेतही त्यांनी बहुमत सिद्ध केलं.

मागे

उद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव
उद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 169....

अधिक वाचा

पुढे  

विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड
विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड

विधानसभेच्या अध्यपदी अखेर नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी ....

Read more